चिपळुणात सर्वच राजकीय पक्षात इच्छूकांची मांदियाळी
नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे सात अर्ज; इतर पक्षातही भाऊगर्दी
चिपळूण : शहराच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे पक्षातील सात इच्छुकांनी अर्ज केले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. ठाकरे शिवसेनेने उमेदवारी मागणाऱ्यांना पक्ष आणि समाजासाठी काय योगदान दिले ते अगोदर सांगा अशी विचारणा इच्छुकांकडे केली आहे. त्यामुळे ठाकरे सेनेतील इच्छुकही बुचकळ्यात पडले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल बाजले आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झाल्यामुळे इच्छुक तयारीला लागले आहेत. दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार असले तरी त्याअगोदर : इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे. आघाडी, युती होण्यापूर्वीच उमेदवारीवरून संघर्षाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. आघाडी, महायुती होवो न होवो; पण सर्वच पक्षाकडून स्वबळाची तयारी सुरू आहे. चिपळूण शहराचे नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आहे. या वर्गात महिला उमेदवारही उभी राहू शकते. त्यामुळे भाजपमधील अनेक माजी नगरसेवकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. १९ तारखेपर्यंत भाजपने इच्छुकांकडे अर्ज मागवले होते. नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी भाजपकडे तब्बल ६५ अर्ज आले आहेत. तसेच नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे काहींनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल म्हणून ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत अर्ज केलेला नाही.
ठाकरे सेनेही निवडणूकीच्या तयारीत उतरली आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांनी नुकतेच गुप्त बैठक झाली. त्या बैठकीत काहींनी नगराध्यक्षपदासाठी तर काहींनी नगरसेवकपदासाठी इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली. ठाकरे सेनेतही इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगराध्यक्षपदासाठी जास्त इच्छुक आहेत. प्रभाग आरक्षणात ज्यांची नगरसेवक पदाची संधी हुकली आहे. ते वरिष्ठ कार्यकर्ते नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. तर काहींना घरातील सदस्यांना उमेदवारी हवी आहे. अशा पक्षपदाधिकाऱ्यांनी आपण पक्षासाठी समाजासाठी काय योगदान दिले ते सांगा त्याचा विचार करूनच उमेदवारी दिली जाईल, असे सांगून पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले आणि इच्छुकांच्या गर्दीत सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांना चाप लावला आहे. त्यामुळे आगामी काळात पालिकेच्या निवडणूकीत रंगत येणार आहे.