मंडणगडात अढळला डेंग्यूसदृश रुग्ण
आरोग्य यंत्रणा सतर्क
मंडणगड:
तालुक्यातील काही गावांमध्ये डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने सतर्क होत ग्रामस्थांचे रक्त नमुने तपासले. मात्र तूर्तास एकही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गेले काही दिवस तालुक्यातील बाणकोट, वेळाससह शहरात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयात डेंग्यूचे उपचार घेत असल्याची परिसरात चर्चा आहे.
याबाबत आरोग्य विभागाला विचारणा करण्यात आल्यानंतर बाणकोट आणि वेळास याठिकाणी ग्रामस्थांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. तसेच गावात धूर फवारणी, साचलेल्या पाण्यात औषध फवारणी करण्यात आली असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र अद्याप डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.