लहरी हवामानाचा मासेमारी व्यवसायाला फटका
रत्नागिरी: पावसाळी मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. नव्या मासेमारी हंगामाला अतिवृष्टी तसेच वादळी वारे यांचा जबरदस्त फटका बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीला पारंपरिक, रापणकार तसेच ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अनपेक्षित नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागल्याने ऑगस्ट-सप्टेंबर हे मासेमारीकरिता पोषक महिने असतानाही खराब हवामानामुळे या दोन महिन्यांत गच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नाही.
परिणामी, लहरी हवामान, सततचा पाऊस आणि वादळी वारे यामुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. नव्या हंगामात चांगल्या प्रकारे मासेमारी करता येईल, अशी अपेक्षा असतानाच नारळी पौर्णिमेनंतर अचानक वादळी हवामान आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे मासेमारीत काही दितसांचा खोळा आला. त्यानंतर पुन्य मासेमारी सुरु झाली.
मात्र, पुन्हा गौरी-गणपतीच्या काळात वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे खराब हवामानामुळे मासेमारीला मोठा फटका बसला. वादळी हवामानामुळे नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवण्याची वेळ आली. वादळी वाऱ्यामुळे इतर जिल्ह्यातील नौकांना रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा, जयगह व अन्य बंदरांचा आसरा घ्यावा लागला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील काही नौकांना इतर बंदरांत नांगर टाकावा लागला होता.
त्याचबरोबर नवरात्रोत्सव सुरु होताच पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ‘शक्ती’ नावाचे वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे अतिवृष्टी आणि वादळी हवामानामुळे हवामान खात्याकडून किनारपट्टीवर ‘रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा मासेमारी नौका किनाऱ्यावर ठेवण्याची वेळ आली.