बोटीवर दारू पिणाऱ्या तरुणावर नाटे पोलिसांची कारवाई
नाटे (राजापूर): महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाटे पोलिसांनी एका परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा तरुण सार्वजनिक ठिकाणी उघडपणे दारू पीत असताना सागरी पोलिसांना आढळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास नाटे परिसरातील आर.एस.एफ. फिश कंपनीजवळ, रस्त्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक उघड्या जागेत ही घटना घडली.
सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल सचिन देविदास आडवे (पोकों २९०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी रामदिन गुखाराम डांगोरा थारू (वय २५), मूळ रा. नारायणपूर, ता. लालयोभी, जि. कैलाली (नेपाळ), सध्या रा. साखरी नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, हा आपल्या बोटीवर बसलेला होता.
आरोपी रामदिन थारू हा पाण्याची बाटली घेऊन त्यामध्ये दारू (दास) ओतून पिण्यासाठी बसलेला असताना पोलिसांना मिळून आला. सार्वजनिक ठिकाणी उघडपणे दारू पिऊन महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाटे सागरी पोलिसांनी त्याच्यावर तातडीने कारवाई केली आहे.
या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात रात्री ७.०५ वाजता घेण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गु.आर.नं. ७१/२०२५ दाखल केला आहे. सागरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.