वृद्धाचा कोल्हापूरला नेताना रस्त्यातच मृत्यू
रत्नागिरी: तब्येत अचानक बिघडल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६२ वर्षीय वृद्धाला प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे कोल्हापूरला हलवत असतानाच त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनली. त्यामुळे त्यांना परत रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपचारासाठी नातेवाईकांनी केलेल्या धावपळीनंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही.
ही दुर्दैवी घटना दिनांक २९/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी मयताचे चिरंजीव शिवप्रसाद कोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
महादेव विश्वनाथ कोरे (वय ६२, रा. गोकळ निवास, रवींद्र नगर, कवारघाव, रत्नागिरी) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खबर देणाऱ्या शिवप्रसाद कोरे यांनी दि. २७/०९/२०२५ रोजी परकार हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचारांसाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान दि. २८/०९/२०२५ रोजी रात्री ९.०० वाजता मयत महादेव कोरे यांच्या प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी झाली. त्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, त्यांना पुढील उपचारासाठी खासगी ॲम्ब्युलन्सने कोल्हापूर येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महादेव कोरे यांना घेऊन कोल्हापूरकडे जात असताना ॲम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याचे त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईक आणि शिवप्रसाद कोरे यांना सांगितले. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता नातेवाईकांनी त्वरित त्यांना परत रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आणले. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दि. २९/०९/२०२५ रोजी ०३.२० वाजता महादेव विश्वनाथ कोरे यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे शहर पोलीस ठाण्यात दि. २९/०९/२०२५ रोजी ०४.४१ वाजता अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे (अमू. क्र. १००/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे). तब्येतीच्या अचानक बिघाडामुळे उपचारासाठी केलेली धडपड अखेर निष्फळ ठरल्याने कोरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.