चिपळूणच्या पागनाका येथे ‘कल्याण मटका’ जुगार खेळणाऱ्या इसमाला रंगेहात पकडले; २ हजारांहून अधिक रक्कम जप्त
चिपळूण, रत्नागिरी: चिपळूण शहरातील पागनाका परिसरात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या कल्याण नावाच्या मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई केली आहे. दिनांक २९/०९/२०२५ रोजी दुपारी १४.३१ वाजता पागनाका येथील रोडलगत असलेल्या एका टपरीसमोर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडले असून, त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक अनिरुध्द राजवैद्य (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद सिताराम भालेकर (वय ५८, रा. बाजारपेठ, चिपळूण) हा पागनाका परिसरात गैरकायदा, बिगर परवाना ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार खेळ खेळताना आढळून आला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीकडून जुगाराच्या साहित्यासह रोख ₹ २,०२५/- इतकी रक्कम जप्त केली. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे ₹ २,०३०/- आहे. याप्रकरणी त्याच दिवशी सायंकाळी १७.१२ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी प्रमोद भालेकर याच्याविरोधात गु.आर.क्र. २२०/२०२५ अन्वये मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेली ही कारवाई अवैध जुगार आणि मटका चालवणाऱ्यांवर जरब बसवणारी ठरली आहे. चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असून, अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असे संकेत या घटनेतून मिळत आहेत.