कासारवेली येथे शाळेसमोरच भरदुपारी ८ वर्षीय मुलाला दुचाकीची धडक; अपघात करून अज्ञात चालक फरार
रत्नागिरी: रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावरील कासारवेली मराठी शाळेसमोर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भरदुपारी रस्त्याच्या कडेला वडिलांसोबत उभा असलेल्या एका आठ वर्षीय मुलाला दुचाकीवरील अज्ञात चालकाने धडक दिली आणि मदत न करताच तो पसार झाला. या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला असून, अज्ञात आरोपीविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक २८/०९/२०२५ रोजी दुपारी १४.३० ते १४.४५ वाजेच्या दरम्यान कासारवेली मराठी शाळेसमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी जखमी मुलाचे वडील शैलेश बाळकृष्ण वरवडकर (वय ४६, रा. कासारवेली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शैलेश वरवडकर हे त्यांचा मुलगा देवांश शैलेश वरवडकर (वय ०८ वर्षे) याचा हात पकडून रस्ता ओलांडण्यासाठी उभे होते.
याच वेळी रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका अज्ञात दुचाकी चालकाने रस्त्याची परिस्थिती आणि शाळेजवळचा परिसर लक्षात न घेता, आपले वाहन अतिवेगाने, हयगयीने आणि बेदरकारपणे चालवले. या भरधाव दुचाकीने देवांश वरवडकर या मुलाला जोरदार ठोकर दिली, ज्यामुळे तो जखमी झाला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने जखमी मुलाला कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता किंवा अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून त्वरित पलायन केले.
या घटनेनंतर, दुसऱ्या दिवशी दि. २९/०९/२०२५ रोजी १८.१८ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) (ब), आणि १०६ (२) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १८४, १३४(ब) आणि १७७ नुसार गुन्हा (गु.आर.नं. ३८४/२०२५) दाखल करण्यात आला आहे. भर शाळेसमोर आणि भरदुपारी अपघात करून पळून जाणाऱ्या या अज्ञात चालकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.