क्रशर कामगाराचा आकस्मिक मृत्यू
संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथील जे. एम. म्हात्रे कंपनीच्या क्रशरवर काम करणाऱ्या सचिन सखाराम घोसाळकर (वय ५३) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथील सचिन घोसाळकर पाच वर्षे क्रशरवर सुपरवायझर म्हणून काम करत होता. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नाश्ता केल्यानंतर तो रूममध्येच असताना अचानक छातीत वेदना होऊ लागल्याने समीर शशिकांत सांडव याने व इतर कामगारांनी रुग्णवाहिकेने वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून अधिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्याच्या दिलेल्या सल्ल्यानुसार त्याच रुग्णवाहिकेने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी डॉ. मोरे यांनी तपासून सचिन घोसाळकरचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. घटनेची माहिती संगमेश्वर पोलिस ठाण्यात देण्यात आली असून, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.