मंडणगडात व्यावसायिकाची तब्बल ११ लाख ७० हजारांची फसवणूक
मंडणगड: ‘आज देतो, उद्या देतो’ असे वारंवार आश्वासन देत एका व्यावसायिकाची तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडणगड तालुक्यातील धुत्रौली येथील अजीम हमीद कडवेकर (वय ४४, व्यवसाय-व्यावसायिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गुलाबराव कोंडे (सध्या रा. नांदगाव नाटे, जि. रायगड) नावाच्या आरोपीने कडवेकर यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
फिर्यादी कडवेकर यांनी दिनांक १४/०७/२०२२ पासून ते दिनांक २१/०८/२०२५ या दीर्घ कालावधीत आरोपी चेतन कोंडे यांच्या बँक ऑफ इंडिया, मंडणगड शाखेतील के. के. मल्हार डेअरी या खात्यावर टप्प्याटप्प्याने एकूण १०,००,००० (दहा लाख रुपये) इतकी रक्कम जमा केली होती.
याव्यतिरिक्त, आरोपीच्या आवश्यक कामासाठी लागणारा दगड (चिरा) देखील कडवेकर यांनी पुरवला होता, ज्याची किंमत १,७०,००० (एक लाख सत्तर हजार रुपये) इतकी होती. अशा प्रकारे, आरोपीकडे कडवेकर यांचे एकूण ११,७०,००० (अकरा लाख सत्तर हजार रुपये) येणे होते.
फिर्यादींनी वारंवार मागणी करूनही आरोपी चेतन कोंडे यांनी सदर रक्कम ‘आज देतो, उद्या देतो’ असे खोटे आश्वासन देत देण्यास टाळाटाळ केली आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजीम कडवेकर यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक २८/०९/२०२५ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ३/२०२५ नुसार, भारत न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१४ (फसवणूक) प्रमाणे आरोपी चेतन गुलाबराव कोंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.