रत्नागिरी मजगांवचे डॉ. अब्दुल्ला इब्जी यांना छत्रपती संभाजी नगर येथे एम.डी. पदवी प्रदान
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मजगांव येथील डॉ. अब्दुल्ला अब्दुल मजीद इब्जी यांनी कठोर परिश्रमाच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. छत्रपती संभाजी नगर येथील एम.जी.एम. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी नुकतेच एम.डी. (डॉक्टर ऑफ मेडिसिन) चे शिक्षण पूर्ण केले असून, महाविद्यालयाच्या समारंभपूर्वक आयोजित केलेल्या पदवीप्रदान सोहळ्यात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. अब्दुल्ला यांनी मोठ्या आनंदाने ही पदवी स्वीकारली. या यशाने मजगांव गावाला पहिले एम.डी. डॉक्टर होण्याचा बहुमान मिळाला असून, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. अब्दुल्ला यांच्या या यशामागे त्यांची आई कैसर बेगम आणि वडील अब्दुल मजीद यांचा आशीर्वाद तसेच त्यांची प्रेरणा आहे. तसेच, त्यांची सेवानिवृत्त शिक्षिका आत्या फरीदा हकीम यांचे उत्तेजन, चुलते एजाज इब्जी आणि शरीफ इब्जी, आजोबा दाऊद हमदुले, मामा अकील हमदुले आणि रियाज हमदुले यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मनःपूर्वक अभ्यास करून हे महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. एम.जी.एम. वैद्यकीय महाविद्यालयाच्या या सोहळ्याला डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. अशोक पाटील, डॉ. विजय कदम, तसेच डॉ. मधूरा नेलानुथूला आदी मान्यवर उपस्थित होते.
एम.डी. मेडिसीन या पदवीवरच न थांबता, उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशाने डॉ. अब्दुल्ला यांनी आता डी.एम. गॅस्ट्रो शिक्षणासाठी केरळ येथील मलाबार वैद्यकीय महाविद्यालयात नुकताच प्रवेश घेतला आहे. उच्च शिक्षण पूर्ण करून रत्नागिरी येथील रुग्णांची सेवा करण्याचा त्यांचा प्रबळ मानस आहे. विशेष म्हणजे, त्यांची बहीण अमीना इब्जी ही सुद्धा एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असल्याने तिला सोबत घेऊन रत्नागिरीत सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. डॉ. अब्दुल्ला यांच्या या पदवीप्रदान सोहळ्यासाठी त्यांचे आई-वडील आणि सर्व नातेवाईक उपस्थित होते. नातेवाईक, मित्रमंडळी, चाहते, मजगांव येथील शिक्षणप्रेमी सरपंच फैयाज मुकादम, मुरादपूर चिपळूण आणि मजगांव येथील ग्रामस्थांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.