धामणी ग्रामपंचायतीत साहित्य खरेदीत भ्रष्टाचार
देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीमध्ये वॉटरकुलर, किचन कट्टा, विहिरींवरील जाळ्या, खेळाचे साहित्य, लॅपटॉप, प्रिंटर, घरघंटी आदी वस्तूंची खरेदी दाखवून एकही वस्तू ग्रामपंचायतीमध्ये नाही. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आमसभेत यावरून जोरदार खडाजंगी झाली. तेव्हा संबंधित ग्रामसेवकाला तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याचे आदेश आमदार शेखर निकम यांनी दिले.
धामणी ग्रामपंचायतच्या स्वच्छ भारत मिशनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अधिकारी नेमून तातडीने कारवाई करावी, असे पत्र १४ ऑगस्ट २०२५ ला गटविकास अधिकारी यांनी दिले होते. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. याबाबत प्रवीण गुरव व श्रीनिवास पेंडसे यांनी आमसभेत हा मुद्दा उपस्थित केला. याबाबत कार्यवाहीचे आदेश आमदारांनी दिले.
ग्रामपंचायतीने आपल्या अधिकारात वॉटरकुलर, किचन कट्टा, विहिरींवरील जाळ्या, खेळाचे साहित्य, लॅपटॉप, प्रिंटर, घरघंटी आदी वस्तूंची खरेदी केली; परंतु त्यातील एकही वस्तू ग्रामपंचायतीमध्ये नाही, हा गंभीर प्रकार आहे. याची प्रशासनाने दखल न घेता संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा निषेध करत ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले होते. तरीही याचे गांभीर्य लक्षात न घेता अशांना पाठीशी घातले जात असल्याची बाब श्रीनिवास पेंडसे यांनी आमसभेत निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आमदार शेखर निकम यांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करून निलंबित करण्याचे आदेश दिल्याने आमसभेत एकच खळबळ उडाली. यावर खरोखरच चौकशी होऊन संबंधित लोकांवर कारवाई होते की, त्यांना थातूरमातूर चौकशी करून पाठीशी घातले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.