दिव्यांग बांधवांसाठी ‘आधार’चे विशेष कवच!
तहसीलदार कार्यालयात विशेष शिबिर संपन्न; शेकडो दिव्यांगांना झाला लाभ.
रत्नागिरी, दि. २७ सप्टेंबर २०२५: शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या आधार कार्डापासून वंचित असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी रत्नागिरीत एका महत्त्वपूर्ण विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तहसीलदार कार्यालयात शनिवारी (दि. २७/०९/२०२५) रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

या विशेष शिबिरामध्ये जे दिव्यांग व्यक्ती किंवा बालके अजूनही आधार कार्ड पासून वंचित आहेत, त्यांची नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यात आली. तसेच, आधार कार्ड अपडेट करणे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, लिंक असलेला मोबाईल नंबर बदलणे, आधार कार्ड वरील फोटो बदलणे, आधार कार्ड वरील पत्ता बदलणे, इत्यादी आवश्यक सेवांचा लाभ यावेळी दिव्यांग बांधवांना देण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटन रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार मा. श्री. राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर नायब तहसीलदार (निवडणूक शाखा) श्रीम. माधवी कांबळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकार मित्र श्री. श्रीकांत जोशी, श्री. पांडुरंग नंदिवाले, श्रीम. शुभ्रा पोवार, तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका तथा प्रकल्प संचालक श्रीम. सुरेखा पाथरे, श्री. संकेत चाळके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व्यक्त करताना प्रकल्प संचालक श्रीम. सुरेखा पाथरे यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी आधार कार्ड केंद्र संचालक श्री. आसिफ मेमन, श्री. योगेश गुरव आणि श्रीम. मुसरत साही, श्रीम. श्रुती पावसकर यांनी मोलाचे कार्य केले. शिबिर संपल्यानंतर दिव्यांग लाभार्थींना श्री. योगेश गुरव यांच्या हस्ते, अधिकार मित्र श्री. श्रीकांत जोशी, श्री. पांडुरंग नंदिवाले, श्रीम. शुभ्रा पोवार आणि प्रकल्प संचालक श्रीम. सुरेखा पाथरे यांच्या उपस्थितीत आधार कार्डाची पावती (प्रदान स्लिप) वितरित करण्यात आली. जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी अशाप्रकारे दोन महत्त्वाच्या संस्थांनी एकत्र येऊन केलेल्या या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.