ग्रामपंचायत नाचणेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उपक्रम
रत्नागिरी: नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून, ग्रामपंचायत नाचणेने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत विविध युवा मंडळांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन केले. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे विशेष शिबिर घेण्यात आले.
मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी विनम्र युवा नवरात्र उत्सव मंडळ येथे आयोजित या शिबिराला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, हातखंबा यांचे सहकार्य लाभले. शिबिरात महिलांची आणि लहान मुलांची विशेष तपासणी करण्यात आली. यात रक्तातील साखरेची (शुगर), रक्तदाब (ब्लड प्रेशर) आणि हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर, महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या अॅनिमियाची तपासणी करून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडी आणि शाळेतील लहान मुलांचे रक्तगट तपासणी करून त्यांना माहिती देण्यात आली. याशिवाय, ‘आयुष्यमान भारत कार्ड’ आणि ‘आयुष्यमान वय वंदना कार्ड’ यांसारखी आरोग्यविषयक महत्त्वाची कार्ड्स गरजू नागरिकांची कागदपत्रे तपासणी करून काढून देण्यात आली, ज्यामुळे त्यांना भविष्यात उपचारांसाठी मदत मिळू शकेल.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत नाचणेचे सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक, ग्रामपंचायत सदस्य सौ. घडशी आणि सौ. सुपल, तसेच मंडळाचे कार्यकर्ते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. खरंबेळे यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने एक चांगला आधार मिळाला आहे.