भाकर सेवा संस्थेमार्फत पंजाब पूरग्रस्तांना मदती करिता पथक रवाना
रत्नागिरी: समाजातील अनेक समस्या व प्रश्न यांना समोर ठेवून भाकर सेवा संस्था ही गेली ३२ वर्ष शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण या विषयांवर काम करते.आज पर्यंत भाकरने अनेक सामाजिक प्रश्नांबाबत प्रकल्प राबविले.तसेच भाकर संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत आज पर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धाव घेऊन समाजाला प्रेरित करत मदतीचा हात दिला आहे. जसे गुजरात भूकंप मदत कार्य २००१, सोलापूर दुष्काळ मदत कार्य २००४,चिपळूण पूर मदतकार्य २०२१, कोविड-१९ मदतकार्य २०२०-२०२१ अशा ठिकाणी भाकरचे पथक पोहोचून आवश्यक ती सर्व मदत करणे आपले कर्तव्य समजते.
गेल्या चार दशकांतील सर्वात भीषण पुरामुळे पंजाबमधील २२ जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे – घरे, शाळा, शेतजमिनी आणि उपजीविका उद्ध्वस्त झाल्या आहेत. कुटुंबांना काहीही शिल्लक नसताना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि पुनर्बांधणीची वाट पाहता येणार नाही. अशा परिस्थिती मध्ये संपूर्ण कोकणातून भाकरने प्रतिनिधित्व करत पूरग्रस्तांना मदतीचे पथक आज रवाना केले.गेले काही दिवस पंजाब मदती करिता समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, भाकर कार्यकर्ते, संस्थेचे संचालक मंडळ आणि संस्थेमार्फत मोलाची मदत पाठविण्यात आली आहे. मदत पथकामध्ये संस्थेचे संस्थापक श्री.देवेंद्र पाटील, श्री.पारस पोवार, श्री श्रेयश घाटगे, श्री.प्रतिक घाटगे, श्री.श्रीधर पाटील यांनी सहभाग घेतला आहे. आज पहिले पथक रत्नागिरी मधून रवाना झाले असून तेथील पूरग्रस्त भागाची परिस्थिती पाहता आवश्यकता असता लवकरच दुसरे पथक देखील रवाना करण्यात येईल. म्हणूनच आम्ही भाकर परिवार आपणा सर्वाना आवाहन करतो कि सामाजिक बांधिलकी म्हणून आपला मदतीचा हात पुढे करावा.याबाबत अधिक माहितीस्तव संस्थेचे संचालक श्री.पवनकुमार मोरे. संपर्क क्र. ८६६९८५८३२४ यांच्याकडे संपर्क करावा.