अनैतिक व्यवसाय प्रकरणी एमआयडीसी प्लॉटचा ताबा घेणार
रत्नागिरी : औद्योगिक विकास महामंडळाने ३४ वर्षांपूर्वी उद्योगासाठी दिलेल्या त्या प्लॉटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत काल उघड झाले. या वेश्या व्यवसायाबाबत पोलिसांच्या अहवालानंतर श्री. प्रभु यांना देण्यात आलेला तो प्लॉट काढुन घेतला जाईल, अशी माहिती एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकरी वंदना खरमाळे यांनी दिला.
एमआयडीसीमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय काल पोलिसांनी उघड केला. स्थानिक गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून हा देहविक्रीचा प्रकाराचा पर्दाफाश केला. देहविक्रीच्या या व्यवसायातून पुणे येथील दोन्ही महिलांची पोलिसांनी मुक्तता केली असून, व्यवसाय करणाऱ्या नेपाळी महिलेला पोलिसांनी अटक केली. एमआयडीसी-मिरजोळे येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. एमआयडीसी प्लॉट नं ई-६९ मिरजोळे येथे एक डमी ग्राहक तयार केले. ते पाठवून पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी एक नेपाळी नागरिक महिला ही पुणे येथील दोन महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय रत्नागिरीत करत असल्याचे उघड झाले. त्यांच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोन महिलांची स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाकडून देहविक्री व्यवसायातून मुक्तता करण्यात केली. तर व्यवसाय करून घेणाऱ्या नेपाळी महिलेला अटक केली.
एमआय़डीसीतील ज्या प्लॉटमध्ये असलेल्या घरामध्ये हा गैरप्रकार उघड झाला तो प्लॉट १०९१ मध्ये श्री. प्रभु यांना उद्योगासाठी एमआयडीसीने दिला होता. परंतु मुळ उद्देश बाजूला ठेऊन या प्लॉटचा त्यांनी गैरवापर केल्याचे पुढे आले आहे. याबाबत एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाल्या, पोलिसांनी जो गैरप्रकार उघड केला, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. हा प्लॉट उद्योगासाठी देण्यात आला होता. ३४ वर्षांमध्ये त्यामध्ये काही विकासा न झाल्याने किंवा तो मुळ उद्देशासाठी विकसीत न केल्याने पोलिसांचा अहवाल आल्यानंतर संबंधिताकडुन तो काढुन घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
नेपाळी महिलेला २ दिवस पोलिस कोठडी
पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या गीता छबी थापा (वय ३९, रा. मुळ नेपाळ) हिला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला दोन दिवसाची पोलिस कोठडी सूनावली आहे. या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का किंवा कधीपासून एमआयडीसीमध्ये हा व्यवसाय सुरू आहे, याची उकल होण्याची शक्यता आहे.