शिवाजी हायस्कूल झाडगावची कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी
विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी चार विद्यार्थ्यांची निवड
रत्नागिरी:- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव, रत्नागिरीने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. या स्पर्धेत शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि जिल्हा कुस्ती असोसिएशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत झाडगाव हायस्कूलच्या एकूण सात कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे यांच्या हस्ते झाले.
१४ वर्षाखालील वयोगटात साईराम महिपती जाधव, वेदांत रामदास खोत, रुद्रा अजित चव्हाण, विकास चंद्रकांत पाटील यांची विभागीय स्तरावर निवड झाली. तर आर्यन यादव डाखोरे याने तृतीय क्रमांक मिळवला. तर अभिनव अमोल जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्व यशस्वी कुस्तीपटूंना क्रीडा शिक्षक एम. डी. पाटील व सैफुद्दीन पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी, उपाध्यक्ष आनंद तापेकर आणि योगेश हळदवणेकर यांचेही मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संपर्क निरीक्षक हुसेन पठाण, मुख्याध्यापक आनंदा पाटील आणि इतर शिक्षकवृंदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशाने शाळेच्या क्रीडा परंपरेत एक नवा अध्याय जोडला गेला आहे.