‘स्थानिक स्वराज्य’ निवडणूकात युतीबाबत संभ्रम
चिपळूण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणांगण एकसंध की, स्वबळावर याचे उत्तर वरिष्ठांकडून मिळत नसल्याने महायुतीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तेव्हा, वेळ पडली तर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरू केली आहे. आमदार शेखर निकम यांनी तशी सूचना संगमेश्वर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केली. त्यानंतर चिपळूण शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
चिपळूण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची फारशी ताकद राहिलेली नाही. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद मात्र वाढली आहे. चिपळूण शहराचा विचार करता पालिकेची प्रारूप प्रभागरचना काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. त्यानंतर शहरातील १४ प्रभागांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध संस्था, संघटनांच्या भेटीगाठींतून जोर-बैठका काढण्यास सुरुवात केली आहे. युती झाली तर वाट्याला किती जागा येणार, आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होणार नाही ना, असे नानाविध प्रश्न नव्या प्रभागरचनेमुळे तयार झाले आहेत. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी युतीचा फॉर्म्युला तात्पुरता गुंडाळून ठेवला असल्याचे बोलले जात आहे. ऐनवेळी स्वतंत्र लढण्याची वेळ आली, तर पंचाईत नको म्हणून सगळ्याच पक्षांतील कार्यकर्त्यांनी स्वबळाचीदेखील तयारी सुरू केली आहे. याआधी महायुतीचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढू, असे सांगत होते. अलीकडे मात्र सर्वच नेत्यांचे सूर बदललेले आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे.
शहरात एकूण १४ प्रभाग निश्चित करण्यात आले असून, २८ नगरसेवक या प्रभागांमधून निवडून दिले जाणार आहेत. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर वरिष्ठांकडून कोणत्याच सूचना मिळत नसल्याने महायुतीमधील भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच प्रभागांमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.