खेडमध्ये बोलेरो आणि डस्टरची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर गुणंदे फाटाजवळ रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास एका भीषण अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. भरधाव वेगाने आलेल्या एका डस्टर गाडीने निष्काळजीपणे ओव्हरटेक करताना समोरील बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली, असे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात खेड तालुक्यातील गुणदे फाट्याजवळ एकेरी मार्गावर झाला. किरण काशिराम शिगवण (वय ३२, रा. असगणी, ता. खेड) हे त्यांच्या बोलेरो गाडी (MP09/AP/6980) मधून चिपळूणहून कल्याणच्या दिशेने जात होते. ते गुणंदे फाटाजवळच्या डिव्हायडरजवळ पोहोचले असताना, समोरून येणाऱ्या डस्टर गाडी (MH09/EK/8288) च्या चालकाने, राहुल विष्णुपंत बडवे (वय ४८, रा. कोल्हापूर) यांनी, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरच्या कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
या निष्काळजीपणामुळे राहुल बडवे यांच्या गाडीने किरण शिगवण यांच्या बोलेरो गाडीच्या उजव्या बाजूला, समोरील आरशाजवळ जोरदार धडक दिली. या धडकेने बोलेरो गाडीचे दोन्ही दरवाजे घासले गेले आणि मोठे नुकसान झाले. तसेच, आरोपीच्या डस्टर गाडीचेही पुढील उजव्या बाजूचे बंपर आणि फेंडर तुटून नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर फिर्यादी किरण शिगवण यांनी तात्काळ खेड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. किरण शिगवण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल बडवे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.