मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ रत्नागिरीत
फॉरेन्सिक तज्ञही उपलब्ध ; पुरावे गोळा करण्यासाठी उपयोग
रत्नागिरी: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कायद्याच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र शासन, गृह विभागामार्फत मोबाईल फॉरेन्सिक प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याकरीता एक अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ फॉरेन्सिक तज्ज्ञांसह उपलब्ध झाली आहे. या व्हॅनचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा पोलिस मैदानावर ही व्हॅन दाखल झाली होती. या उद्घाटनावेळी अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्रीमती राधीका फडके, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व इतर अधिकारी उपस्थित होते. गुन्ह्याचे घटनास्थळ संरक्षित करणे आणि घटनास्थळावरील भौतिक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्यासाठी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रीयेत ब्लॉकचेन यंत्रणेचा उपयोग करण्यात येणार आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्यासाठी अत्याधुनिक किट्स, रसायने व साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्ह्याची उकल करणे, आरोपीविरुध्द जास्तीत जास्त पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर करणे अधिक सोईस्कर होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा होवून पिडीतांना न्याय मिळण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.