तरुणीवर अत्याचारप्रकरणी ग्रामसेवक निलंबित
देवरुख: तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी खडीकोळवण येथील ग्रामसेवक हरिदास शिवाजी बंडगर (रा. कवठेमहांकाळ, जि. सांगली) याला निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, आरोपी बंडगर याची ओळख एका विवाह संकेतस्थळावर त्याच्याशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. मात्र लग्नाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर आरोपीने तिला विश्वासात घेऊन एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी देवरूख पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६ (बलात्कार) व ३१३ (मनाविरुद्ध गर्भपात) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, या प्रकरणाचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला सादर केला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली आहे.