लांजा शहरात वीजखांबाला आग; महावितरण कर्मचाऱ्याचे धाडसाने टळला मोठा अनर्थ
लांजा : गुरुवारी रात्री ११ वा. सुमारास शहरातील बाजारपेठ परिसरातील रखांगी प्लाझा जवळील महावितरणचे विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. काही क्षणांतच खांबावरील केबल पेट घेऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ,आणि मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली. याबाबत नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांना तात्काळ कळविण्यात आले, व सुरक्षा कारणास्तव काही काळ वीजपुरवठा थांबवला गेला.
मुसळधार पावसातही महावितरणचे कर्मचारी ओंकार आगरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आपल्या प्राणाची पर्वा न करता जळत असलेली केबल बाजूला केली आणि आग विझवली. त्यांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला, तसेच काही वेळेतच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, यासाठी आमदार किरण सामंत यांनी आधीच महावितरण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. महावितरण कर्मचारी ओंकार आगरे यांच्या धाडस आणि तत्परतेबद्दल नागरिकांनी कौतुक करत महावितरणचे आभार व्यक्त केले.