तेजससह जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार दादरपर्यंत
खेड
सीएसएमटी मुंबई रेल्वेस्थानकातील फलाट ११ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकणातून मुंबईकडे जाणारी तेजससह जनशताब्दी एक्स्प्रेस ३१ ऑगस्टपर्यंत सीएसएमटी स्थानकाऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून सीएसएमटी फलाट क्र. १२ व १३च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या फलाटावरील रेल्वेगाड्यांचा थांबा इतर फलाटावर केला जातो. तर काही रेल्वेगाड्यांचा फलाटाअभावी सीएसएमटी स्थानकातील थांबा रद्द करण्यात येतो. गेल्या अनेक महिन्यांपासून सीएसएमटी स्थानकातील फलाट क्र. ११ ते १३चे काम वेगाने सुरू आहे. यातील फलाट क्र. ११चे काम पूर्ण झाले आहे. फलाट क्र. १२ व १३च्या विस्तारीकरण कामाने वेग घेतला आहे.
नोव्हेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. याचमुळे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तेजस एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येत आहे. त्यानुसार २२१२० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस ३१ ऑगस्टपर्यंत सीएसएमटी स्थानकाऐवजी दादर स्थानकापर्यंत धावेल. १२०५२ क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसही ३१ ऑगस्टपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. या पाठोपाठ १२१३४ क्रमांकाची मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेसही ३१ ऑगस्टपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे. या बदलामुळे गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना मुंबईत गेल्यानंतर इच्छितस्थळ गाठताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.