ग्राहक बनून आलेल्या महिलांनी केले सोन्याचे मंगळसूत्र लंपास
खेड :- खेड शहरातील निवास तळ भागात असलेल्या प्रसिद्ध ऋषभ ज्वेलर्समध्ये धक्कादायक चोरीची घटना घडली. ग्राहकाच्या वेशात आलेल्या चार महिलांच्या टोळीने दागिने पाहण्याच्या बहाण्याने सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास केले. या संपूर्ण प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेजमधून उलगडा झाला असून पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार महिलांचा गट ग्राहक बनून दागिने पाहाण्यासाठी दुकानात दाखल झाला. खेडमध्ये ‘ग्राहक’ बनून सोन्याचे मंगळसूत्र लंपास दागिन्यांची निवड करताना त्यातील एका महिलेने अंदाजे २.५ ते ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मणी (किंमत सुमारे २५ ते ३० हजार रुपये) हातात घेतले. क्षणातच तिने ते मंगळसूत्र हातात ठेवून सरळ दुकानाबाहेर पळ काढला. तिच्या पाठीमागे इतर तीन महिलांनीही पळ काढला. सीसीटीव्हीत कैद झालेला प्रकार अचानक घडलेल्या या घटनेने दुकानदार व कर्मचारी काही क्षण गोंधळले. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे चित्रित झाला असून त्यावरून पोलिस तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
खेड-दापोली परिसरात याआधीही महिलांकडून अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच खेड रेल्वे स्थानक परिसरात, रिक्षात बसण्याच्या गडबडीत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व दागिन्यांची बॅग लंपास करण्यात आली होती. या सलग घटनांमुळे महिलांची टोळीच या चोरीमागे सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय अधिकच बळकट झाला आहे. खेड पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सोन्याचे व्यापारी व मौल्यवान वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सतर्क राहाण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांच्या वेशात येणाऱ्या अशा टोळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची ही सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे .