धुक्याचा अंदाज न आल्याने माचाळच्या दरीत कोसळली कार; सुदैवाने जीवित हानी टळली
लांजा : तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण माचाळ येथील प्रसिद्ध रिव्हर्स फॉल परिसरात मंगळवार २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. धुक्याचा अंदाज न आल्याने ईर्टीगा कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातातील गाडीत तीन महिला आणि एक पुरुष होते. कार कोसळल्यानंतर त्यांनी तात्काळ माचाळ ग्रामस्थांना माहिती दिली. मात्र अंधार पडल्याने अपघातग्रस्त वाहन बाहेर काढणे त्या रात्री शक्य झाले नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार २७ ऑगस्ट रोजी अपघातग्रस्त वाहन वर काढण्यासाठी क्रेन मशीन मागवण्यात आली. परंतु, क्रेन मशीनने गाडी बाहेर काढताना तीच चिखलात फसल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली होती, नंतर जेसीबी मशीनने गाडी काढण्यात आली. तर गुरुवार २८ ऑगस्ट रोजी उशीरा संध्याकाळपर्यंत क्रेन मशीन हलविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, सदर ईर्टीगा कार ही देवरुख येथील असल्याची चर्चा असून या अपघाताची तालुक्यात जोरदार चर्चा रंगली असून माचाळ येथे वाहने पार्किंगसाठी स्पष्ट सूचना फलक असूनही संबंधित व्यक्तींनी कार रिव्हर्स फॉलच्या परिसरात का नेली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच माचाळ पर्यटनस्थळावरील नियमांचे होत नसेलेले पालन यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.