लांजात जयघोषात व पारंपरिक पद्धतीने झाले बाप्पांचे आगमन
घरगुती १६१३१ तर सार्वजनिक ७ गणपतींची प्रतिष्ठापना
लांजा :
गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त लांजा तालुक्यातील गावोगावी आणि शहरातील घराघरांत गणरायांचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले. सकाळपासूनच “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.गावोगावी भाविकांनी डोक्यावर मूर्ती घेऊन बाप्पांना घरी आणले. घराघरांत रांगोळ्या, तोरणे, फुलांची सजावट आणि आरत्यांच्या निनादामुळे उत्सवाचे वातावरण अधिकच मंगलमय झाले.
यंदा लांजा तालुक्यात तब्बल १६ हजार १३१ घरगुती गणपतींचे आगमन झाले असून कुवे, भांबेड, व्हेळ, कोर्ले, बेनी, खानवली व लांजा पोलिस ठाणे या सात सार्वजनिक मंडळांतही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणेशोत्सवासाठी सोमवारपासूनच काहींनी बाप्पांना घरी आणले होते. मात्र बुधवारी गणेश चतुर्थी असल्याने सकाळपासूनच गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेची लगबग सुरू झाली. महिलांच्या मंगलगजरात, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत करण्यात आले.
बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर लांजा शहरातील बाजारपेठेतही दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. फुलांचे हार, सजावटीची साहित्ये, मातीची भांडी, पूजाविधीची सामग्री, मिठाई अशा वस्तू खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग होती. बाजारपेठेला यामुळे उत्सवी स्वरूप लाभले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शांततेत आणि भक्तिभावाने मूर्तींची प्रतिष्ठापना पूर्ण झाली.
संपूर्ण तालुका सध्या बाप्पाच्या आगमनाने भक्तिभावाने न्हाऊन निघाला असून पुढील दहा दिवस गणेशोत्सवाच्या आनंदात आणि उत्साहात दुमदुमून राहणार आहे.