प्रवासी महिलेच्या दागिन्यांवर डल्ला
खेड : तालुक्यातील खेड रेल्वेस्थानक ते एसटी बसस्थानक दरम्यान रिक्षाने प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याची घटना रविवारी (ता. २४) दुपारी घडली. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आनंदी अभिषेक देवघरकर (वय २८) या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसने दिवा रेल्वे स्थानकावरून प्रवास करत होत्या. दुपारी त्या खेड रेल्वेस्टेशनवर उतरल्या. रिक्षामधून त्या खेड बसस्थानकाकडे रवाना झाल्या. या प्रवासात त्यांच्या पर्समधील १ लाख १० हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र १९८८९ ग्रॅमचे असून, त्याची किंमत ८७ हजार रुपये, २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले ७.८० ग्रॅम, सोन्याची नथ ३ हजार २०० रुपये असे दागिने होते. हे दागिने रिक्षात शेजारी बसलेल्या अज्ञात महिलेने पर्सची चैन उघडून चोरल्याचे तक्रारीत आनंदी यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.