डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; बहुजन समाज पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली कारवाईची मागणी
रत्नागिरी: गोळप येथील नरेंद्र आंबेकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे आंबेकर यांचे उपचाराअभावी निधन झाल्याचा आरोप पक्षाने केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी गोळप येथील नरेंद्र आंबेकर यांना सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बहुजन समाज पार्टीने निवेदनात नमूद केले आहे.
याव्यतिरिक्त, बहुजन समाज पार्टीने डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या दालनात राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो लावलेले नाहीत. हा शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन असून, हे अधिकारी मुजोरी करत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
यावेळी, जिल्हाधिकाऱ्यांनी बहुजन समाज पार्टीसोबत सकारात्मक चर्चा केली. त्यांनी डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हेकेखोर वृत्तीबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही पक्षाने सांगितले.
यावेळी निवेदन देण्यासाठी बहुजन समाज पार्टी, रत्नागिरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष राजेश सावंत, उपाध्यक्ष भारत पवार, माजी अध्यक्ष राजू जाधव, माजी महासचिव किशोर पवार, सेक्टर अध्यक्ष अनंत पवार, प्रितम सावंत आणि जिल्हा प्रभारी अनिकेत पवार उपस्थित होते.