दाभोळमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात दोघे जण जखमी
दापोली : तालुक्यातील दाभोळमध्ये दोघांवर भटक्या श्वानांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. दाभोळ बाजारपेठ व परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
काही दिवसांपूर्वी एका शिकवणीसाठी जाणाऱ्या ५ वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिच्या डोक्याला २५ टाके घालण्याची वेळ आली होती. तर पुन्हा भटक्या श्वानांनी बावा देसाई व योगेश महामुणकर यांच्यावर एकत्रिपणे हल्ला चढवून चावा घेतला. यात या दोघांना गंभीर दुखापत झाली. दाभोळ परिसरात दिवसेंदिवस भटक्या श्वानांचा वावर वाढत असून यामुळे लहान मुले, मोठ्या माणसांना रस्त्याने फिरणे धोक्याचे बनल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.