बनावट अधिसूचना प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा
राजापूर:
औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील क्षेत्रासाठी एक बनावट अधिसूचना तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट अधिसूचनेमुळे स्थानिक नागरिक आणि संबंधित विभागामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीचे अधिकारी पद्माकर सीताराम कनावजे (४५, रा. आर-११५, झाडगाव, एमआयडीसी कॉलनी, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.५४ वाजण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अधिनियम १९६१ च्या कलम ६ अंतर्गत राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील क्षेत्रासाठी एक बनावट अधिसूचना तयार केली. ही अधिसूचना २१ जुलै २०२५ पासून लागू झाल्याचे दाखवण्यात आले होते. ही बनावट अधिसूचना खरी असल्याचे भासवून ती वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आली. या बनावट अधिसूचनेमुळे एमआयडीसीच्या कामकाजाबद्दल संभ्रम निर्माण झाला व आणि लोकांमध्ये चुकीची माहिती पसरली. ही बाब गंभीरतेने घेत पद्माकर कनावजे यांना पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीनुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३६ (२), ३३६ (३), आणि अज्ञात ३४० (१) प्रमाणे आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून बनावट अधिसूचना तयार करून ती प्रसारित करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. अशा प्रकारच्या बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच ती पुढे प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणतीही अधिकृत माहिती केवळ सरकारी किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे आणि ती प्रसारित करणे, हा गंभीर गुन्हा असून.. अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.