जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’
रत्नागिरी
जिल्हाभरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाचा बुधवारी दिवसभर जोर ओसरला होता. त्यामुळे मंगळवारपर्यत इशारा पातळीच्या वर ते अगदी धोकादायक पातळी गाठलेल्या जिल्ह्यातील नद्यांचे पाण्याने निर्माण झालेली पूर परिस्थिती अनेक भागात ओसल्याचे चित्र आहे. पावसाच्या या उसंतीने ऐन गणेशोत्सवाच्या तयारीची धावपळ करणाऱ्या साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे. हवामान विभागाकडून २४ ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्षाकडून बुधवारी सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या अहवालानुसार, जगबुडी नदीची पाण्याची पातळी सकाळी ७.८० मीटरवरून सायंकाळी ५.९० मीटर इतकी इशारा पातळीच्या वर होती. याखालोखाल राजापूर तालुक्यातील कोदवली नदीसुद्धा इशारा पातळीच्या वरून वाहत असून या नदीसाठी असलेली इशारा पातळी ४.९० मीटर इतकी असून मात्र यादिवशी सायंकाळी ती ५.२० मीटर पातळीवरून वाहत होती.
याउलट चिपळूणमधील वाशिष्ठी नदीचे पाणीदेखील कमालीचे ओसरले होते. नदीची इशारा पातळी ५ मीटर इतकी असून सायंकाळी ३.६० मीटर पातळीवर वाहत होती. दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री व सोनवी, लांजा तालुक्यातील काजळी व मुचकुंदी तसेच बावनदी या सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात पूरस्थिती हळूहळू आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील २४ तासांतील पर्जन्यमान
मंडणगड : १०१.७५ मिमी, खेड : १८२.१४ मिमी, दापोली : १३९.७१०३ मिमी, चिपळूण १६६.६७ मिमी, गुहागर : १३०.४० मिमी, संगमेश्वर : १३८.९१ मिमी, रत्नागिरी : ११८.२२ क मिमी, लांजा : ९७.८० मिमी, राजापूर : १११.६२ मिमी., तर एकूण पाऊस ११८७.२२ मिमी., सरासरी पर्जन्यमान – १३१.९१ मिमी. इतके आहे.