कोंडगावमध्ये विहिरीत पडून गव्याचा मृत्यू
देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने या मृत गव्याला बाहेर काढून त्याच्यावर अंत्यसंसकार करण्यात आले.
कोंडगाव येथील सुरेश गांधी यांच्या मालकीच्या जमिनीत १५ फूट खोल विहीर आहे. बोअरवेलच्या माध्यमातून यातील पाण्याचा वापर केला जातो. पाण्याला दुर्गधीयुक्त वास येऊ लागल्याने मंगळवारी सकाळी गांधी यांनी पाहणी केली असता त्यांना विहिरीत गवा पाण्यावर तरंगताना दिसून आला. याची खबर गांधी यांनी वनविभागाला दिली.
याबाबत माहिती मिळताच वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक सुरज तेली, आकाश कडुकर, सुप्रिया काळे, सहयोग कराडे आदींनी घटनास्थळी पाहणी केली. विहिरीतून बाहेर काढत या गव्यावर खड्डा मारून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार ते पाच दिवसांपूर्वी हा गवा विहिरीत पडला असावा असा अंदाज वनविभाने वर्तवला आहे. उघड्या विहिरी वन्यप्राण्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत.