रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मालवण येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः सीएसटी मेंगलोर रेल्वेने प्रवास करणाऱ्या मालवण येथील प्रौढाची तब्बेत अचानक बिघडली. बेशुद्ध अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संजय गोपाळ कोळंबकर (वय ४७, रा. मिऱ्याबांध-मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) सकाळी साडेसहा वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय कोळंबकर हे सीएसटी मेंगलोर रेल्वेने प्रवास करत असताना त्यांची तब्बेत अचानक बिघडली. रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे थांबल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे