गणेशोत्सवासाठी राजापूर शहर होतेय सज्ज
पेव्हर ब्लॉक व रानतळे रस्त्यावरील काँक्रिटीकरण पूर्ण
राजापूर: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी राजापूर शहर सज्ज झालेले दिसून येत आहे. राजापूर नगर परिषदेने आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरील चौगुले फार्मसी ते शिवस्मारक या दरम्याने पेव्हर ब्लॉक बसवल्याने या भागातील खड्ड्यांची समस्या संपुष्टात आली आहे.याशिवाय रानतळे रस्त्याच्या प्रारंभी पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आल्याने हा रस्ताही आता वाहतुकीसाठी सुयोग्य झाला आहे.
स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला तसेच गणेशोत्सव आदी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राजापूर शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या भागात पडलेले खड्डे वाहनचालक आणि नागरिकांसाठी त्रासाचे ठरले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत रिक्षा व्यावसायिक तसेच वाहनचालक व नागरिकांतून तक्रारी होत होत्या. हा विषय आमदार किरण सामंत यांच्याकडे नेण्यात आल्यानंतर त्यांनी नगर परिषद प्रशासनाला गणेशोत्सवापूर्वी यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. मुख्याधिकारी तुषार बाबर व कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव तसेच अभियंता रणवीर देसाई यांनी त्यानंतर पावसाळी हंगामातील शहराच्या मध्यवर्ती भागातील खड्यांची समस्या दूर करण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा पर्याय सुचवला होता. त्यावर आ. सामंत यांनी सहमती दर्शवत गणेशोत्सवापूर्वी ही समस्या दूर करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान रानतळे रस्त्यावरील काही मिटर्सचे काँक्रिटीकरण तसेच शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरच्या पेव्हर ब्लॉकचे काम आता संपुष्टात आले असून हे काम होत असताना शहरातील नागरिकांना काही दिवस एसटी वाहतुक बंदचा जो फटका बसला त्याबद्दल न.प. प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. उर्वरित दिवसांत पावसाचा जोर कमी होताच शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे भरण्यात येणार असल्याचे न.प. प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.