जिल्ह्यात मूर्ती चित्रशाळा गजबजू लागल्या
जिल्ह्यात ६० टक्के शाडूच्या तर ४० टक्के पीओपीच्या गणेशमूर्ती
रत्नागिरी: गणेशोत्सवाला केवळ पंधरा दिवस शिल्लक असल्याने जिल्ह्यात मूर्ती चित्रशाळा गजबजू लागल्या आहेत.दिवसरात्र काम करण्यात मूर्तिकार कंबर कसत आहेत. घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सध्या जिल्ह्यात ६० टक्के गणेशमूर्ती शाडूच्या असल्या तरी ४० टक्के गणेशमूर्ती पीओपीच्या आहेत.
कमी वेळात शाडूच्या मूर्ती तयार होत नाहीत; मात्र पीओपीवरील बंदी उठवल्यामुळे पीओपीच्या मूर्ती चित्रशाळांमध्ये दिसू लागल्या आहेत. यावर्षीही गणेशमूर्ती दरात ३० ते ३५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाप्पा महागणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
जिल्ह्यात शाडू, कागद, गोमय गणपतीची मूर्ती चित्रशाळांमध्ये आकार घेऊ लागल्या होत्या. पीओपीवरील बंदी उठावी याची प्रतीक्षा ग्रामीण भागातील मूर्तिकार करत असताना शासनाने बंदी उठवल्यामुळे मूर्तिकारांमधून आनंद व्यक्त केला गेला; मात्र पीओपीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी नैसर्गिक तलावातच मूर्तीचे विसर्जन करावे, असेही नमूद केले आहे. बंदी उठल्यामुळे मूर्तिकारांना हायसे वाटले. कमी वेळेत मूर्ती तयार करणे सोपे गेले. अनेकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पेण-पनवेल, कोल्हापूर येथून पीओपीच्या कच्च्या मूर्ती आणल्या. काहींनी तयारच मूर्ती आणून चित्रशाळांना जोड दिली. कच्च्या मूर्ती घरी आणून त्यांचे पॉलिश, रंगकाम, सजावट करून विक्री तयार केल्या आहेत; मात्र पीओपी बंदीमुळे पेण येथेच गणेशमूर्ती कमी प्रमाणात तयार केल्यामुळे ग्राहकांना शाडूच्या मूर्ती खरेदी कराव्या लागणार आहेत. दरवर्षी कच्च्या मालाच्या किंमती वाढतात. कच्च्या मालाच्या किमती यावर्षीही वाढल्या आहेत. दरवर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ होत असते; मात्र मागणीच्या तुलनेत कमी उपलब्धता असल्यामुळे मूर्तीच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पीओपीपासून गणेशमूर्ती तयार केली जात असली तरी वाहतूकखर्च, रंग, ब्रश, सजावटीचे साहित्य याशिवाय मजुरीचे दर वाढल्यामुळे गणेशमूर्तीच्या दरात ३५ टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे.