तिसंगीत बिबट्याकडून पाड्याची शिकार
खेड : तालुक्यातील ऐनवरे गावातील पोलिस पाटील शिवाजी पोफळकर यांच्या वाड्यातून बिबट्याने वासरू उचलून नेल्याची घटना ताजी असतानाच तिसंगी गावातही भरदुपारी बिबट्याने शेतकरी अनंत आप्पाजी राव भोसले यांच्या पाड्याची मुख्य रस्त्यावर शिकार केली. या सलग घटनांमुळे ऐनवरे, तिसंगी, सातगाव व अठरा गाव बांधर या पट्ट्यात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने काही दिवसांपूर्वीच आपल्या वाहनांतून बिबटे या भागात सोडल्याचीही चर्चा आहे. ऐनवरे येथील दिनेश पोफळकर यांनी वनविभागाला लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आवाहन केले असून जर पुढील आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर शेतकरी मोठे पाऊल उचलतील, असा इशारा दिला आहे.