हरचिरी ग्रामपंचायतीत बँक ऑफ इंडिया चांदेराई शाखेतर्फे ‘आर्थिक समावेशन योजना व रि-केवायसी’ शिबिराचे आयोजन
रत्नागिरी,- हरचिरी ग्रामपंचायतीत बँक ऑफ इंडिया चांदेराई शाखेतर्फे आर्थिक समावेशन योजना व रि-केवायसी शिबिराचे आज आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन नरेंद्र रघुनाथ देवरे, झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी श्री. देवरे यांनी गावकऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY), प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत खाते उघडण्याचे, बँक खात्याला वारस नामांकन करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच आपल्या बँक खात्याची रि-केवायसी करण्याकरिता क्यूआर कोड, एसएमएस, बँक मित्र चैनल द्वारे आणि बँक शाखेशी संपर्क करून करता येते, असे सांगितले आणि उपस्थित नागरिकांना प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर आर्थिक समावेशन योजना व रि-केवायसी शिबिराची मोहीम दि. 01.07.2025 ते 30.09.2025 पर्यंत असणार आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही याची माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे एल.डी.ओ. विजय कोरडे यांनी उपस्थितांना रि-केवायसीचे महत्त्व समजावून सांगितले व वित्तीय योजनांवरील तसेच फसवणूक प्रतिबंधावरील जागरूकता व्हिडिओ दाखवले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन दत्ताराम कानसे यांनी तीन महिन्यांच्या आर्थिक समावेशन योजना मोहिमेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “या मोहिमेत ग्रामपातळीवर कोणताही व्यक्ती आर्थिक समावेशन योजनांपासून वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायतीने बँकांना पूर्ण सहकार्य करावे”.
वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिबिरादरम्यान सर्व उपक्रम राबविण्यात आले. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व अटल पेन्शन योजना या योजनांमध्ये नोंदणी व रि-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. किरण पोळ, बँक ऑफ इंडिया, चांदेराई शाखा व्यवस्थापक यांनी शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले व गावकऱ्यांना सर्व आर्थिक समावेशन योजनेअंतर्गत नोंदणी व रि-केवायसीसाठी बँक ऑफ इंडिया चांदेराई शाखेत संपर्क करण्याचे आवाहन केले.
या शिबिराला सरपंच दत्ताराम येरिम, उपसरपंच फराद बुखारी, ग्रामसेवक हर्षल रसाळ, ग्रामपंचायतीचे सदस्य, बँक अधिकारी व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.