योगेश कदम यांना माझे भक्कम पाठबळ
उपमुख्यमंत्री शिंदे : कोणत्याही अफवांमुळे गोंधळून जाऊ नका
खेड: ज्यांनी स्वतः भ्रष्टाचार केला, तेच आज इतरांवर आरोप करत आहेत. जर दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले, तर काय म्हणायचं. योगेश कदम यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे. कोणत्याही अफवांमुळे गोंधळून जाऊ नका. शिवसेना आणि सरकार दोन्ही खंबीर आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते बोलत होते. शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विकासकामांमध्ये विलंब होणार नाही, निर्णय लगेच घेतले जातील आणि तत्काळ उपलब्ध निधी करून दिला जाईल. मी निधी वाटप करताना कधी हात आखडता घेतलेला नाही. नो रिझन… ऑन द स्पॉट डिसिजन हे माझं काम करण्याचं तत्त्व आहे. शिवसेनेच्या मूळ विचार रुजविण्याचा माझा निर्धार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे आपण चाललो आहोत. केवळ सत्तेसाठी काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना मुक्त करण्यासाठी आम्ही उठाव केला आणि जनतेनेही तो स्वीकारला.
विधानसभेतील यशाचे श्रेय जनतेच्या आशीर्वादाला दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महायुतीला २३२ जागा मिळाल्या. यामागे माझ्या लाडक्या बहिणी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्या कामावर दाखवलेला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.