सह्याद्रीनगर येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी, ः शहरातील सह्याद्रीनगर येथील रक्तदाबाचा त्रास असलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुलभा रमाकांत धामापूरकर (वय ७२, रा. समर्थ संगम अपार्टमेंट, सह्याद्रीनगर, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २५) रात्री नऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुलभा यांना गेली दोन वर्ष रक्तदाबाचा त्रास होता. शुक्रवारी त्या घरातील बेडरुममध्ये झोपलेल्या असताना त्यांची कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याने त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.