जिल्ह्याला दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी :-
मागील काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचा जोर रविवार पासून पुन्हा वाढला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात २३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या आणि समुद्र किनाऱ्यावरील रहिवाशांनी सतर्क राहावे, पर्यटकांनी विनाकारण समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काही काळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शनिवार, रविवारी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यातील नदी, धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. जिल्ह्यात सलग दोन दिवस दमदार पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, भात लावणीस वेग आला आहे. तब्बल ३६ हजारांहून अधिक हेक्टरवर भात लावणी झालेली आहे. दरम्यान, झालेल्या पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तसेच घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.