माचाळकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी
पोलिसांची कार्यवाही; हुल्लडबाजी, मद्यसेवनामुळे निर्णय
लांजा : तालुक्यातील मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या ‘माचाळ’ या पर्यटन गावाला जाऊन काही पर्यटक हुल्लडबाजी आणि मद्यसेवन करत असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आज लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माचाळकडे जाणाऱ्या सर्व गाड्याची तपासणी सुरू केली आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेली हिरवीगार झाडी, नागमोडी रस्ते, धुक्याची चादर यामुळे माचाळमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. थेट रस्ता झाल्यामुळे पर्यटकांना अधिकच सोयीचे झाले आहे. मात्र, त्यामुळे अनेक जण मद्य सेवन आणि हुल्लडबाजी करतात. त्याचा त्रास येथील स्थानिक ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे अशा पर्यटकांवर कारवाई झालीच पाहिजे.
मात्र, इतर पर्यटकांवर कोणताही परिणाम होणार नाही याचीही संबंधित यंत्रणेकडून खबरदारी घेणे गरजेचे आहे. पर्यटन वाढीमुळे येथील नागरिकांना रोजीरोटीचे साधन निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी जाणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मद्याची वाहतूक, दारू पिऊन गाडी चालविणे, असे प्रकार कमी होणार आहेत.