मंडणगड साईनगर येथे भरदिवसा घरफोडी
अज्ञाताने लांबविले सोन्याचे रोकडसह दागिने
मंडणगड: मालक घरात नसल्याचे निमीत्त साधुन अज्ञात चोराने मंडणगड शहरातील साई नगर येथील एका घरातून दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 18 जुलै 2025 रोजी भर दिवसा झालेल्या चोरीमुळे ग्रामिण व निमशहरी भागातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
साईनगर येथील अभिजित विलणकर हे दुपारच्या सुमारास बाजारात काही कामासाठी गेलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील सुमारे २६ ग्रॅम वजण्याचे सोन्याचे दागिने व ८ हजार रोख रक्कम लंपास केली. बाजारातील काम आटपून घरी आल्यावर आपल्या घरात चोरी झालेली असल्याचे श्री. विलणकर यांचे लक्षात येताच त्यांनी शेजारी व नातेवाईकांना याबाबत कल्पना दिली. शहरात चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
दरम्यान चोरी बाबतीत माहीती कळताच मंडणगड पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबतचा पंचनामा केला असून गुन्हा नोंदविला आहे. अभिजित विलणकर यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीतील माहितीनुसार त्यांच्या घरातील १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ चैन, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची १ चैन, १ तोळे वजनाचा सोन्याचा गळ्यातील हार, ३ ग्रॅम वजनाचे कानातील जोड आणि ८ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास मंडणगड पोलिस करीत आहेत.