‘फायनान्स’कडून जादा व्याजदराने वसुली
जनता दल सेक्युलर; महिलांची पिळवणूक, कारवाईची मागणी
चिपळूण ः जिल्ह्यात खासगी सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी धुमाकूळ घातला असून, अव्वाच्यासव्वा दराने कर्जाची वसुली केली जात आहे. यामध्ये महिलांची पिळवणूक होत असल्यामुळे संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या व संबधित खासगी सावकारांवर कारवाई करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कर्जवसुली करताना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दलचे निवेदन तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांना देण्यात आले. फायनान्स कंपन्यांनी नियमबाह्य कर्जवाटप करून आर्थिक साक्षर नसलेल्या महिलांना कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहे. आधीचे कर्ज फेडण्यासाठी दुसरे, तिसरे कर्ज दिले जात आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरताना महिलांची तारांबळ उडत आहे. कर्जाचे हप्ते आठवडा, पंधरवडा व मासिक पद्धतीने भरावे लागतात. त्याच्या वसुलीसाठी एजंट कधीही महिलांच्या घरी येत असून, हातात पैसे मिळेपर्यंत ते जात नाहीत. अनेकदा मध्यरात्रीही पैशासाठी घरी येतात. महिलांना अपशब्द वापरले जात असून, धक्काबुक्की केली जाते. प्रत्यक्षात व्याजदर २४ टक्के सांगितला गेला असला तरी २८ ते ३६ टक्के व्याज घेतले जात आहे. मनाला वाटेल तो व्याजदर लावला जात आहे. तरी या प्रकरणांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर ८५ महिलांच्या सह्या केल्या आहेत. हे निवेदन देताना अझीझ सय्यद, शोभना सकपाळ, रुकसाना खान, नजमा सय्यद, मनाली कदम, शारदा सावंत, पूजा शिंदे आदी उपस्थित होते.