मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे ट्रक चालवून समोरुन येणार्या टेम्पोला धडक देत अपघात करत मुज्जकिर अमजत जांभारकर (42रा.पडवे,गुहागर) या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. अपघाताची ही घटना मंगळवार 15 जुलै रोजी सकाळी 6.30 वा निवळी ते जयगड जाणार्या रस्त्यावरील ओरी-घवाळीवाडी स्टॉपच्या पुढे घडली होती.
चाँद मोहम्मद वल्लेभाई (27,रा.हुक्केरी बेळगाव,कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,मंगळवारी सकाळी चाँद वल्लेभाई हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-08-जीजे-4347) घेउन बेळगाव ते जयगड असा येत होता. सकाळी 6.30 वा.सुमारास तो ओरी घवाळीवाडी स्टॉपच्या पुढे चढावात उजवे वळण घेत असताना समोरुन येणारा टेम्पो (एमएच-08-डब्ल्यू-4703) ला धडक देत अपघात केला होता. या अपघातात टेम्पोमधील मुज्जकिर जांभारकर,अमजत अलीमिया जांभारकर व फिरदोस न्यायत खले हे सर्वजण गंभिर जखमी झाले होते. यातील मुज्जकिरला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.