चिपळुणात भटक्या कुत्र्यामुळे रिक्षा पलटी
महिला प्रवासी बचावल्या
चिपळूण :
शहरातील बुरूमतळी येथील मुख्य रस्त्यावर मंगळवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. एका भटक्या कुत्र्याने चालत्या रिक्षाच्या स्टेअरिंगवर थेट उडी घेतल्यामुळे रिक्षा पलटी झाली. सुदैवाने रिक्षाचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
या रिक्षामध्ये एक वयोवृद्ध महिला प्रवासी होत्या. अपघातानंतर त्या घाबरल्यामुळे त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. रिक्षा चालक व महिला दोघेही सुखरूप असून किरकोळ धक्क्याखेरीज अन्य इजा झालेली नाही. मात्र या अपघातात उडी मारणाऱ्या कुत्र्याचा मृत्यू झाला.
ही घटना चिपळूण तालुक्यातील टेरव येथील रहिवासी परेश काणेकर यांच्या रिक्षाला घडली. ते आपल्या रिक्षातून वयोवृद्ध महिलेसह चिपळूणच्या दिशेने निघाले होते. पाग पॉवर हाऊस ते चिंचनाका या मार्गावर असताना बुरूमतळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर अचानक एक भटका कुत्रा धावत येऊन थेट रिक्षात उडी मारून स्टेअरिंगवर आदळला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालक गोंधळून गेला आणि स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. या घटनेने नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी काही वेळातच मदतकार्य पोहोचले.
शहरातील वाढते भटके कुत्रे आणि यामुळे निर्माण होणारे अपघात, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.