पहिला जागेवर ताबा मग बुद्ध विहार
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत एकमुखी एल्गार
रत्नागिरी :
शहरामधील थिबा राजा कालीन बुद्ध विहाराची राखीव ठेवलेली जागा पुन्हा समाजाच्या ताब्यात मिळावी या करिता” थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीची” दुसरी बैठक रविवार दिनांक १३/०७/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन | सिव्हील हॉस्पिटल शेजारी । रत्नागिरी येथे पार पडली. या बैठकीला रत्नागिरी तालुक्यामधील बहुसंख्य समाज बांधवांची उपस्थिती लाभली होती.
सदर बैठकीमध्ये जमलेल्या सर्व समाज बांधवानी थिबा राजा कालीन बुद्ध विहाराची जागा प्रथम समाजाच्या ताब्यात घावी असा एक मुखाने ठराव केला. ही जागा मिळावी त्याकरिता प्रशासनाशी चर्चा करून रस्त्यावर उतरायची वेळ आली, तर त्या आंदोलनाची दिशा ठरविणारे मार्गदर्शन उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी केले. थिबाराजा कालीन बुद्ध विहाराचा जागेचा विषय संपूर्ण तालुक्यामधील घराघरापर्यंत कसा पोहोचविता येईल या करिता कोणत्या प्रकारे व्यूहरचना करता येईल, या करिता उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी आपली मते मांडली.
सभेला उपस्थित असलेल्या तरुण बांधवांनी उपस्थितांना प्रेरणा देणारे विचार व्यक्त केले, त्यामुळे समाज बांधवांत उत्साह संचारला आहे. थिबा राजा कालीन बुद्ध विहाराच्या ताब्याकरिता तर आहेच पण प्रामुख्याने समाजाची मागणी असलेली मंजूर झालेली जागा प्रथम ताब्यात घेवूया आणि मग समाजाच्या पैसे जमा करून त्या ठिकाणी समाजाच्या मालकीचे बुद्ध विहार बांधूया अशी मागणी उपस्थितांनी केली.