१५ मत्स्य अधिकाऱ्यांना अखेर नियुक्ती पत्रे
रत्नागिरी
रिक्त पदांमुळे कार्यक्षमता घसरलेल्या मत्स्य व्यवसायं विभागात नवीन १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती गुरुवारी राज्य सरकारने केली. या खात्याचे मंत्री नीतेश राणे यांनी प्रस्तावावर अंतिम स्वाक्षरी करुन नियुक्तीचा मार्ग मोकळा केला.
या संदर्भात मत्स्य विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी या विषयावर अधिकाऱ्यांची बैठक झाली. नियुक्ती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली. खात्याचे सचिव रामस्वामी यांनी या विषयावर आवश्यक कार्यवाही केली. या नियुक्त्यांची पार्श्वभूमी अशी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र शासन या पदासाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या. अंतिम निकाल २० नोव्हेंबर २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी १५ उमेदवारांची यादी मत्स्य व्यवसाय विभागाकडे पाठवण्यात आली. ५ डिसेंबर २०२४ रोजी सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली. २९ जानेवारी २०२५ रोजी वैद्यकीय व चारित्र्य पडताळणीही पूर्ण करण्यात आली. ०४.०४. २०२५ रोजी पर्याय प्रपत्र शासनाने भरून घेतले. गुरुवारी राज्य सरकारने १५ उमेदवारांची नियुक्तीपत्रे जारी केली. यामुळे कर्मचारी टंचाईने मेटाकुटीला आलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाला दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी कक्ष तसेच नियमित कामकाजासाठी अधिक अधिकारी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.