
विलासराव कोळेकर यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी: जिल्ह्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना ए. डी. फाऊंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विद्यालयाचा सतत शंभर टक्के निकाल लावण्याबरोबरच त्यांनी एक उपक्रमशील शाळा म्हणून दि मॉडेल शाळेस नावारुपाला आणली आहे. गेल्या वर्षी या शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. शिवाय या प्रशालेत अद्ययावत लॅब असुन शासनमान्य एम एस सी आय टी कोर्सेस ही सुरु आहेत. श्री. कोळेकर हे मुख्याध्यापक संघाचे रत्नागिरीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेवून हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. पुणे येथे 26 जुलै रोजी अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे या संस्थेचे व सर्व सहका-यांचे आपणास सर्वोत्तम सहकार्य मिळत असल्यामुळेच चांगले काम करु शकलो असे या प्रसंगी ते म्हणाले. त्यांना यापुर्वी
महाराष्ट्र गौरव, राष्ट्रीय लोकनायक, पत्रकार भूषण, राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभारत्न पुरस्कार,रयतधारा पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची जन्मभूमी सांगली जिल्ह्यातील मालेवाडी तर कर्मभूमी सैतवडे आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.