
तब्बल ६ महिने चाललेल्या नाट्य स्पर्धेचा आज निकाल
नटश्रेष्ठ कै. रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटक स्पर्धा
रत्नागिरी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्यावतीने सहा महिने चाललेल्या उत्सवी नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण आज ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मृदुला रमेश भाटकर, उपस्थितु राहणार आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा नोव्हेंबर २०२४ पासून मे २०२५ पर्यंत चालली. स्पर्धक संस्थांनी कुठेही न जाता आपल्या उत्सवाच्या ठिकाणी नाटक सादर करायचे होते. एकदा का नोंदणी झाली की नाट्य परिषदेच्या माध्यमातून दोन परीक्षक नाटकाचं परीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित रहात असत. त्या नाटकाचे परीक्षण करून बनविलेले निकाल नाट्य परिषदेच्या कार्यालयात जमा केले जात असत. या स्पर्धेत तब्बल ४७ नाटकांनी सहभाग नोंदविला. २० ज्येष्ठ रंगकर्मीनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केले. त्यामध्ये रंगकर्मी अमर तथा आप्पा रणभिसे, श्रीमती. अनुया बाम, अॅड. श्रीमती रजनी सरदेसाई, पूर्वा खालगावकर, पूर्णिमा साठे, सुधाकर बेहरे, विजय पोकळे, नागेश बेर्डे, विनयराज उपरकर, अॅड. श्रीकांत भाटवडेकर, श्रीकांत पादीला सनातन रेडीज, सुहास साळवी, पुरुषोत्तम केळकर विनायक जोशी, चंद्रशेखर मुळ्ये, संतोष सनगरे, शैलेश चव्हाण आणि अमेय धोपटकर, वामन जोग यांनी काक पाहिले. स्पर्धा प्रमुख म्हणून अमेय धोपटकर तर संतोषक सनगरे यांनी स्पर्धेच्या नियोजनाचे काम पाहिले.
रत्नागिरीकर रंगकर्मीनी तसेच नाट्यरसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या वतीने करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी सांगितले.