
लांजात मुंबई गोवा महामार्गावरील अतिक्रमणवर अखेर बुलडोझर
भर पावसात महामार्ग विभागाने केली कारवाई
लांजा बाजारपेठेला पोलीस छावणीचे स्वरूप.
लांजा: शहरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हद्दीत असणारी अतिक्रमणे दि.३ जुलै पर्यत व्यवसायिकांनी स्वतःहून हटवावीत अन्यथा अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येतील व संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशा सक्त सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने पाच दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या. देण्यात आलेल्या कालावधी संपुष्टात आल्याने न हटविलेली अतिक्रमणे गुरुवारी दि. ३ रोजी सकाळपासून राष्ट्रीय महामार्ग विभागाने पोलीस बंदोबस्तात हटविण्याची प्रक्रिया हाती घेतली. मात्र प्रशासनाने केलेल्या कारवाईने लांजा शहरातील व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे.
लांजा शहरातील व नागरपंचायतीकडे नोंदणीकृत असलेले तब्बल तीनशेच्या जवळपास व्यवसायिक गुरुवारी महामार्ग विभागाने केलेल्या कारवाईत बाधित झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला सुरुवात होऊन पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला. मात्र लांजा शहरामध्ये महामार्गाचे काम अजूनही रखडलेल्या स्थितीमध्ये आहे. लांजा शहरातील महामार्ग कामाला गती देण्याच्या दृष्टीने महामार्ग केंद्र प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने लांजा शहरात महामार्गावर अतिक्रमण केलेल्याना सूचना वजा आवाहन केले होते. शहरात महामार्गावरील टपऱ्या, दुकाने व अन्य अतिक्रमणे दि. ३ जुलै पर्यंत व्यवसायिकांनी स्वतःहुन हटवावी असे आवाहन केले होते. महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या सुचनेमध्ये महामार्गाची हद्द ही गटाराच्या बाहेर पाच ते सहा फूट असून पुलाखालील असणारी सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित सर्व टपरी, दुकान, स्टॉल चालक यांनी देण्यात आलेल्या कालावधीत सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवावीत अन्यथा महामार्ग प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तामद्ये सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. यासह अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशा सूचना महामार्ग प्राधिकरण विभागाच्यावतीने देण्यात आल्या होत्या.
दरम्यान गुरुवारी ३ जुलै रोजी महामार्ग प्राधिकरण विभागाने दिलेली डेडलाईन संपुष्टात आल्याने अखेर आपल्या लवाजम्यासह कडक पोलीस बंदोबस्तात लांजा शहरातील अतिक्रमनांवर बुलडोजर चालविला. लांजा बाजारपेठेत महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम दिवसभर सुरु होती. गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस असतानाही भर पावसात अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू होती. लांजा बाजारपवठेत सर्वत्र पोलीस बंदोबस्त असल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. छोटे मोठे व्यवसायिक बाधित होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता महाराष्ट्र समर्थ फेरीवाला विक्रेता संघटना यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पाठिंबा देऊन प्रशासनाच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत व्यवसायिकांच्या पाठीशी राहून आंदोलन उभं करू असाही शिवसेने ने इशारा दिला होता. मात्र कारवाई होताच संबंधित प्रशासन आणि बाधित व्यवसायिक, उबाठा शिवसेना यांच्यामध्ये वादाला तोंड फुटण्याची श्यक्यता आहे. त्यामुळे महामार्ग विभागाने कारवाई केली मात्र व्यवसायिक आणि त्यांना समर्थन दिलेल्या उबाठा शिवसेनेच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.