रत्नागिरी पोलिसांकडून दंगा काबू योजनेचा सराव
रत्नागिरी ः मुस्लीम बांधवांचा मोहरम, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शहर, ग्रामीण पोलिसांनी चंपक मैदान येथे दंगा काबू योजनेचा सराव केला. यावेळी अश्रुधूराची नळकांडी फोडण्यात आल्याने दंगलसदृश्य परिस्थिती घटनास्थळी निर्माण करण्यात आली होती.
मोहरम, आषाढी एकादशीच्या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्तरित्या चंपक मैदान येथे दंगल काबू योजनेचा सराव केला.
दंगल काबू सरावामध्ये 30 आरसीपी, दोन्ही पोलीस स्थानकातील 30 कर्मचारी, 4 वाहने, 64 लाठ्या, 64 हेल्मेट, 30 शिल्ड, 10 रायफल्स, एक मेगाफोन, एक गॅसगन, स्ट्रेचर, 12 बोर रायफल आदी शस्त्रांचा समावेश होता. दुपारी 3.45 वाजता सुरू झालेला सराव 4.45 वाजता संपवण्यात आला.
पोलीस निरीक्षक सतिश शिवरकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह शहर, ग्रामीण पोलीस स्थानकाचे अधिकारी सहभागी झाले होते.